नागपूर: नागपूरकरांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.तसेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली.
नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे जावो, या मनोकामनेसह भाविकांनी दिवसाचा शुभारंभ केला.नववर्षानिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेचे 50 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.याकरिता मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. भक्तांसाठी पार्किंग व्यवस्था, ज्येष्ठांसाठी व्हीलचेअरची सोय, लहान बाळांसाठी फीडीग रुमची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिक्युरीटी गार्डही तैनात करण्यात आले होते. या सर्व सुविधांमुळे भक्तांनी शांततेत महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले.
2025 च्या पहिल्याच दिवशी सकाळपासून नागपुरातील प्रार्थनास्थळांमध्ये लोकांनी गर्दी केली. टेकडी गणेश मंदिर, वर्धा रोडवरील साई मंदिर, कोराडीतील जगदंबा महालक्ष्मी मंदिर, अदासा येथील हनुमान मंदिर, आग्याराम देवी मंदिर, महालचे कल्याणेश्वर मंदिर, त्रिमूर्तीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी पूजा केली. मोठा ताजबाग, छोटा ताजबाग, मोमीनपुऱ्यातील जामा मशिदीमध्येही इबादत करून नववर्षाची सुरुवात करण्यात आली. दीक्षाभूमीवरही बौद्ध अनुयायांनी नववर्षाचे स्वागत करीत अभिवादनासाठी सकाळपासून गर्दी केली होती.