नागपूर : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा अनधिकृत सावकारांकडून छळ झाला होता, असे निरीक्षण लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी अशाच एका सावकाराच्या तक्रारीवर सुनावणी करताना नोंदवले.
महाराष्ट्रात अनेक अनधिकृत सावकार आहेत, जे कर्ज दिल्यानंतर शेतकरी आणि इतर लोकांना त्रास देतात, असे न्यायमूर्ती कानडे म्हणाले. शेतकरी आत्महत्यांवर राज्य सरकारने केलेल्या कारवाईची चौकशी करावी लागेल,असेही ते म्हणाले. नंदुरबारच्या एका रहिवाशाने सुनील पाटील नावाचा माणूस बेकायदेशीरपणे” सावकारी व्यवसाय चालवत असल्याचे सांगत तक्रार दाखल केली. एका दाम्पत्याने पाटील यांच्याकडून कर्ज घेतले होते.
त्या दाम्पत्यानी पाटील यांच्याकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत केली होती. मात्र, पाटील व इतर पाच जण या दाम्पत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असून त्यांचा छळ करत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.लोकायुक्तांनी 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात अनेक सावकार योग्य परवान्याशिवाय कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यांना कर्ज देत आहेत आणि त्यांचा छळ करत आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारांच्या छळामुळे आत्महत्या केल्या आहेत.
न्यायमूर्ती कानडे यांनी अशा सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक, नंदुरबार आणि इतर जिल्ह्यांतील निबंधकांनी काय कारवाई केली हे शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.
राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना नोटीस बजावण्यात येणार असून त्यांना चार आठवड्यांत त्याबाबतचा अहवाल सादर करावा लागेल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जून रोजी होणार आहे.