‘फ्लॅग डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम’
13 ते 28 मे दरम्यान होणार क्रीडा महोत्सव
नागपूर: कोविडमुळे दोन वर्षे खासदार क्रीडा महोत्सव होऊ शकला नाही. पण यंदा हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदा 42 हजार खेळाडू या महोत्सवात भाग घेतील असा अंदाज आहे. जास्तीत जास्त प्रकारच्या खेळांचा या महोत्सवात समावेश करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असून खासदार क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
महोत्सवाच्या ‘फ्लॅग डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम’ दरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. प्रवीण दटके, माजी आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, खा. डॉ. विकास महात्मे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आ. सुधाकर देशमुख, आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रशिक्षक विजय बारसे, आ. विकास कुंभारे, माजी महापौर संदीप जोशी, आ. मोहन मते, माजी आ. अशोक मानकर उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवातून खेळाडूंमधील खेळाचे कौशल्य जगभरात जावे व नागपूरचे नावही जगभरात चमकावे हा उद्देश असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- प्रत्येक घरातील लहान मुलांच्या हातातील मोबाईल काढा आणि त्यांना मैदानांवर खेळांसाठी पाठवा. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि व्यक्तिमत्त्वही घडेल. 15 दिवस हा क्रीडा महोत्सव चालणार असून 46 जागांवर खेळांच्या स्पर्धा होतील. 1064 खेळणार्या चमू महोत्सवात येणार असून 42 हजार खेळाडून क्रीडा महोत्सवात भाग घेतील. विविध खेळांच्या 9237 स्पर्धा घेण्यात येणार असून 560 टॉफीज संघटनांना दिल्या जातील. 7830 पदक दिली जातील. या सर्वांची किंमत 1 कोटी 3 लाख 75 हजार रुपये आहे, असेही ते म्हणाले.
हा क्रीडा महोत्सव 13 ते 28 मे या दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. नागपुरात 131 खेळांची मैदाने तयार झाली आहेत. 350 मैदाने तयार करण्याचा प्रयत्न आहे. पण जी तयार झाली आहेत. त्या मैदानांवर फुकट पाणी टाकले जाईल. 131 मैदानांना वीज व पाण्याचे कनेक्शन मिळाले आहे. या मैदानांची देखभाल जो चांगल्या रीतीने करू शकेल त्या भागातीलच लोकांच्या ताब्यात ती देण्यात येतील. पण रोज सकाळ आणि सायंकाळी मैदानांवर मुले खेळली पाहिजेत. सर्व आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवकांनी त्यांच्या क्षेत्रात अशी मैदाने तयार करावी. अतिक्रमणापासन मैदाने वाचवली जावी. नागपूर हे स्पोर्ट्स कॅपिटल व्हावे. चांगले खेळाडू येथे तयार व्हावे, अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी व्यक्त केली.
या महोत्सवात नागपूर जनतेने, सर्व खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन करताना ना. गडकरी म्हणाले- शासकीय संस्थांनाही त्यांच्या क्षेत्रात मैदाने तयार करण्याची विनंती आपण करू. उन्हाळा असल्यामुळे सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान विविध खेळांच्या स्पर्धा व्हाव्यात असेही ते म्हणाले.