Published On : Wed, Jan 8th, 2020

सुश्री मोहांती यांच्या नृत्याने आणि नुरान सिस्टर्स व आदित्य खांडवे यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त

Advertisement

कालिदास समारोहाचे समापन
नागपूरच्या रसिकांनी अनुभवली सांस्कृतिक पर्वणी

नागपूर: प्रसिद्ध ओडिसी नृत्‍यांगना सुश्री मोहांती यांच्‍या अप्रतिम रसाभिनय आणि हस्‍ताभिनयाने नागपूरकर रसिकांवर मोहिनी घातली तर स्थानिक युवा गायक आदित्य खांडवे आणि नुरान सिस्टर्स यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त झाले.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेशीमबागेतील सुरेभ भट सभागृहात तीन दिवस चाललेल्‍या कालिदास सांस्‍कृतिक महोत्‍सवाने संगीत, नृत्‍यांची नागपूरकरांना पर्वणी दिली.

राजकारणी राजकारणात व्यस्त असताना विदर्भातील प्रशासकीय अधिकारी आपला सांस्कृतिक वारसा निष्‍ठेने जपत आहेत. तीन दिवसीय या महोत्‍सवात सादर झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या कार्यक्रमांनी रसिकांना सांस्‍कृतिक पर्वणीच दिली असल्‍याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार यावेळी म्‍हणाले.

महोत्‍सवाच्‍या तिस-या दिवसाच्‍या पहिल्‍या सत्रात युवा गायक आदित्‍य खांडवे यांचे गायन झाले. आदित्य खांडवे यांच्‍या ताज्‍या व रसरशीत गायनाने सुरुवात झाली. ‘अमन काहे को सोच करे…’ या गाण्‍याला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्‍याचे तयारीचे सादरीकरण, सूर आणि बोलांवर अचूक पकड रसिकांना भावून गेली. त्‍याला तबल्‍यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे, तानपु-यावर मयुर पटाईत आणि रूद्र प्रताप दुबे यांनी उत्‍तम साथ दिली.

ओडिसी नृत्यांगना सुश्री मोहांती आणि चमूने मनोहारी नृत्‍य सादर केले. कवी कालिदास यांच्या ऋतूसंहार या महाकाव्यावर आधारीत आषाढस्य प्रथमदिवसे या नृत्‍याने त्‍यांनी नृत्‍याला प्रारंभ केला. भरतनाट्यम आणि कथ्‍थक या नृत्‍यप्रकारांचे मिश्रण असलेल्‍या या नृत्‍यातून मोहांती यांनी रसाभिनय आणि हस्‍ताभिनयाचा सुरेख मेळ साधला. त्‍यांनी कवी जयदेव यांनी लिहिलेल्या अष्टपदी या रचनेवर आधारित खंडीता युवती विलापम् हे राधा-कृष्ण नृत्य सादर करीत रसभाव निर्माण केला. सूर्याष्टक या नृत्‍याद्वारे त्‍यांनी सुर्योदय आणि सुर्यास्त असा प्रवास आपल्‍या नृत्‍यकौशल्‍याने सादर केला तेव्‍हा रसिक मंत्रमुग्‍ध झाले. त्‍यांना व्हायोलिनवर गुरू रमेशचंद्र दास, बासरीवर गुरू जवाहर मिश्रा, पखावजवर गुरू दिवाकर परिडा यांनी साथ दिली तर बोल गुरू सुखांत कुमार कुंडू यांचे होते. न्‍या. मनिषा काळे, उपायुक्‍त संजय घिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषा जायभाये, उपायुक्‍त सुधाकर तेलंग व सहायक निदेशक (लेखा) यांनी कलाकारांचे स्‍वागत केले.

विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार म्हणाले, कालिदास समारोहाला नागपूरकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही परंपरा कायम राखण्यात येईल व असेच उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. तीन दिवसीय कालिदास समारोह ही नागपूरकर रसिकांसाठी सांगितिक मेजवानी ठरली. कालिदास समारोहाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र व देशाची संस्कृती जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनेही आगामी वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ संजीव कुमार यांनी सांगितले.

श्री. सुनील केदार यांनी कालिदास समारोहाला शुभेच्छा संदेश दिला. सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर व श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी केले. उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.

कालिदास समारोहामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून संगीतातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यात कालिदास महोत्सवाचे आयोजन महत्त्वाची भुमिका बजावत असल्याचे मत रसिकांनी व्यक्त केले.

पुढील वर्षी ‘मालविकाग्निमित्रम्’
संस्‍कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार कवि कुलगुरू कालिदास यांच्‍या स्‍मृतिंना उजाळा देण्‍यासाठी दरवर्षी कालिदास सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येते. मागील तीन वर्षांपासून कालिदास सांस्‍कृतिक महोत्‍सवाची संकल्‍पना कालिदासांच्‍या महाकाव्‍यांवर आधारित असते. यावर्षीचा महोत्‍सव कवी कालिदासाच्‍या “विक्रमोर्वशीयम्”या नाटकावर आधारित होती. पुढील वर्षी कालिदासाची पहिली नाट्यकृती ‘मालविकाग्निमित्रम्’ या पाच अंकी नाटकावर राहणार असल्‍याची घोषणा सुधाकर तेलंग यांनी केली.

Advertisement