महावितरण नागपूर मंडळाची आढावा बैठक
नागपूर: महावितरणच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे किंवा दिरंगाईमुळे फीडर बंद राहिले आणि नागरिक वीजपुरवठ्यापासून वंचित राहिले तर शाखा अभियंत्याला जबाबदार ठरवून त्याच्या वेतनवाढीशी ही बाब जोडली जाणार असल्याचे संकेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
महावितरण नागपूर मंडळाची आढावा बैठक आज ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतली. या बैठकीला मुख्य अभियंता घुगल, जिल्हा विद्युत नियंत्रण समिती अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते. देखभाल दुरुस्ती योग्य असेल तर फीडर वारंवार बंद होत नाहीत. तांत्रिक कारणाशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस शिवाय कोणतीही कारवाई मुख्य अभियंत्यांनी केली नसल्याचे आढळून आले. सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते मुख्यालयी राहात नसल्यामुळे फीडर ट्रीप झाल्याचे त्यांना कळत नाही व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेशिवाय राहावे लागते.
तसेच एसएनडीएलची ग्राहकांना मिळणारी सेवा योग्य नाही. दररोज एसएनडीएलबद्दल तक्रारी येत आहेत. तसेच ग्राहकसेवा चांगली नसल्यामुळे एसएनडीएलला बरखास्तीची नोटीस देण्याचे निर्देश देताना ऊर्जामंत्र्यांनी महावितरणचे प्रादेशिक संचालक म्हणून आपल्या स्तरावर एसएनडीएलवर कारवाई करण्यास सांगितले. तसेच वीजपुरवठा करणारी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी करण्यात येणार्या योजनेची कामे रेंगाळली आहे. त्यामुळे शाश्वत वीजपुरवठा होत नाही. आयपीडीएस, दीनदयाल या योजनांची कामे अजून पूर्ण झालेली नाही. निधीची कमी नाही पण कामे रेंगाळली असल्याकडे ऊर्जामंत्र्यांनी लक्ष वेधले.
याच बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी सौर कृषी पंप कनेक्शनचा आढावा घेतला. तसेच बेरोजगार अभियंत्यांना प्राधान्याने कामे देण्याचे निर्देश दिले. तसेच बिलांबाबतच्या तक्रारी, मीटर रिडिंगबाबतच्या तक्रारी, पैसे भरले असताना कनेक्शन न मिळण्याच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे सांगण्यात आले.