Published On : Tue, Mar 27th, 2018

महावितरणची ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा वीजग्राहक, कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची सुविधा सर्व राज्यभर

Advertisement


नागपूर: ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतीशील होत आहे.

डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणावयाची असेल तर जास्तीत जास्त सेवा सुविधा ऑनलाईन होणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र उपयुक्त मोबाईल ॲप यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय आता कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज ऑनलाईन करता यावे यासाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कर्मचारी पोर्टलमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी सर्व वैयक्तिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. यात पगारपत्रक, आयकर तपशील, पदोन्नती व उच्चवेतनश्रेणीच्या लाभाबाबतची कार्यवाही, विभागीय परीक्षेचा अर्ज व विविध प्रशिक्षणे, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्यांसाठी अर्ज व मंजुरी, रजेचा अर्ज व मंजुरी, शिस्तभंग कारवाईबाबतची माहिती, सेवाज्येष्ठता यादी, बदली विनंती अर्ज इत्यादी सुविधा कर्मचारी पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. या पोर्टलमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही विहित मुदतीत ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. ईलायब्ररीची सोय कर्मचारी पोर्टलमधून करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्व प्रशासकीय परिपत्रके, सेवाविनियम उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्यांची सोडवणूक या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे. कर्मचारी पोर्टलमध्ये लॉग ईन करताना कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून पोर्टलच्या सुरक्षित वापरासाठी खातरजमा केली जाते. कर्मचारी पोर्टलमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासंबंधी विविध नोटीफिकेशन्स उपलब्ध होतात. त्याद्वारे उपलब्ध अचूक माहितीच्या आधारे त्वरीत निर्णय घेणे शक्य होते.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी डॅशबोर्डची महत्वपूर्ण ठरणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यात विविध माहिती ऑनलाईन व एकत्रितपणे उपलब्ध होत आहे. महावितरणच्या वीजग्राहकांची आकडेवारी व यादी, ग्राहकांच्या तक्रारी व त्याचे निवारण, त्यांना देण्यात आलेले वीजबील, ग्राहकांनी केलेला देयकाचा भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे महावितरणची दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक व एकसमान उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विविध विभागातून येणाऱ्या माहितीत त्रुटी राहणार नाही व ती एक समान राहील. त्यामुळे या माहितीवर तात्काळ विचार करून अचूक निर्णय होईल व परिणामी या निर्णयाची प्रभावी अंबलबजावणी करता येईल. डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती व विश्लेषणाचा उपयोग करून महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांना आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण व वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह इतर विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर परिणामकारक उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.

महावितरणने मागील वर्षांत ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अँपची सुविधा उपलबध करून दिली. या अँपमुळे कामकाजाला गतीशीलता मिळाली आहे. कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्ड या सुविधांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व सुलभ करता येत असून त्याद्वारे ग्राहकांनाही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होत आहेत.

Advertisement