नागपूर : केंद्रीय सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत येणा-या नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित एमएसएमई-डीआय (विकास संस्था) मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजने अंतर्गत ऑक्सिजन प्लांटची स्थापना करण्या संदर्भात विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिका-यांची आणि संस्थेचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार यांच्यादरम्यान बैठक संपन्न झाली . नागपूरच्या विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन या संघटनेमध्ये 100 हून अधिक खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात येणा-या अडचणीवर मात करण्यास सदर बैठकीमध्ये खासगी रुग्णालयांच्या क्लस्टरसाठी एमएसएमईच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजने अंतर्गत ऑक्सिजन प्लांट एक सीएफसी (कॉमन फॅसीलिटी सेंटर) म्हणून स्थापित करण्याच्या शक्यतेसंदर्भात चर्चा करण्यात आली . नागपुरात ही खाजगी रुग्णालये ‘सेवा उपक्रम’ म्हणून एमएसएमई कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहेत.
या बैठकीदरम्यान 10 कोटी रुपये किमतीचा ऑक्सिजन प्लांट ज्याप्रकल्पाद्वारे सुमारे 1700 सिलेंडर प्रति दिवस पुरवण्याची क्षमता असेल , तो स्थापन करण्यासाठी चर्चा झाली . याकरिता विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन या योजनेनुसार स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यास तयार असल्याच सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी आवश्यकतेनुसार 10 ते 30 टक्के योगदान खाजगी हॉस्पिटल देण्यास तयार आहेत आणि उर्वरित 70 टक्के रक्कम केंद्रीय सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे या सीएफसीला (कॉमन फॅसीलिटी सेंटर) अनुदान म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प अस्तित्वात आल्यास देशाच्या इतर भागातही त्याचे अनुकरण केले जाऊ शकते.
त्वरित सदर योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल ( डीपीआर) तयार केला जाईल व तातडीने मंत्रालयाकडे सादर केला जाईल ज्यासाठी तयारी सुरू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले . यामुळे नागपुरातील खासगी रुग्णालये या सीएफसीकडून सेवा देण्यास सक्षम होतील जे नागपुरात “ऑक्सिजन बँक” म्हणून काम करतील. या सीएफसीच्या स्थापनेसाठी जमिनीचा शोध घेणे सुरु आहे.
कोरोना संकटकाळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे केवळ भारतातच नव्हे तर विदर्भातही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन ही जीवनवाहिनी बनली आहे आणि म्हणूनच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी, एमएसएमई-डीआय तर्फे , नागपुरात करोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी पीपीई किट विकसित केली गेली आणि शासनाला वितरित केली गेली होती .
या बैठकीला डॉ. अशिक बुराडे, न्यूक्लियस मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंकज अग्रवाल, न्यूक्लियस, हॉस्पिटल, डॉ. मुकुंद ठाकूर, झेनिथ हॉस्पिटल / विवेका हॉस्पिटल, डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. सौरभ मुकवार, मिडास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. प्रमोद गिरी, न्यूरॉन ब्रेन अँड स्पाइन हॉस्पिटल, डॉ. आलोक उमरे, आरोग्यम सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, डॉ. अनुप मरार, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. संतोष ढोले, ऑक्सम हॉस्पिटल, चेतन गुप्ता, प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. पंकज हरकुत, स्वास्थम हॉस्पिटल, नागपूर हे विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.