मुंबई: जुन्या मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरची हुसेनी ही सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेअाठ वाजता काेसळली. 117 वर्षांच्या या जीर्ण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 34 जणांचा मृत्यू झाला. यात 24 पुरुष, 9 महिला व एका तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. बचाव पथकांनी 51 रहिवाशांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. बचाव कार्यात अग्निशमन दलाचे 5 व एनडीआरएफचा एक जवान जखमी झाला आहे.
तुफानी पावसानंतर मुंबापुरी हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ही दुर्घटना घडली. सकाळच्या वेळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताच परिसरात सर्वत्र धुळीचे लोळ उठले. त्या गोंधळात शेजारच्या इमारतीमधील काही रहिवाशांनीही जीव वाचवण्यासाठी अापल्या इमारतीतून उड्या मारल्या. अग्निशमन दलाचे 125 व अंधेरी येथून एनडीआरएफचे 90 जवान बचाव कार्यात सहभागी झाले हाेते.
ढिगाऱ्याखालून सुटका 51 जणांची सुटका
बहुसंख्य बोहरी समाज वास्तव्याला असलेला हा परिसर दाटीवाटीचा आहे. इमारतीशेजारी मिठाईची अनेक दुकाने होती, त्यामुळे ढिगाऱ्याखाली किमान 60 ते 65 लोक अडकले असण्याची भीती वर्तवण्यात येत होती. या सहामजली इमारतीत 10 सदनिका व 6 गोदामे होती. 5 कुटुंबे राहत हाेती, तर 5 कुटुंबे यापूर्वीच संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाली हाेती.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. फडणवीस यांच्यासह गृहनिर्माण मंत्री प्रकश मेहता, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी घटनास्थळी भेट दिली. पालिका आयुक्त अजोय मेहता अाणि मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनीही घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
इशारा टाळून पाच कुटुंबांचा निवास
हुसेनी म्हाडाची उपकर प्राप्त इमारत असून 2011 मध्ये ती बोहरी धर्मगुरूंच्या पुढाकाराने स्थापन सैफी बुऱ्हानी ट्रस्टकडे पुनर्विकासासाठी दिली होती. म्हाडाने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले हाेते. रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरेही उपलब्ध करून दिली होती. तरीसुद्धा 5 कुटुंबे इथेच राहत हाेती. दरम्यान, इमारती धोकादायक नव्हती, पालिकेने नोटीसही बजावली नव्हती, असे शेजारच्या हारून इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.