शिर्डी: मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या शिर्डीहून मुंबई व हैद्राबाद विमानांची प्रत्येकी एक-एक फेरी होते़ सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास मुंबईहून आलेले एअर अलाएन्सचे विमान धावपट्टी सोडून जवळपास शंभर फूट बाजूच्या रिकाम्या जागेत गेले़ वैमानिकाचे विमानाच्या गतीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते़ मूळ धावपट्टीवर विमान लॅन्ड होण्याऐवजी रेखा एरियासाठी उभारलेल्या विस्तारीत धावपट्टीच्या पुढे शंभर फूट हे विमान गेले़ या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला़ ७२ आसनी असलेल्या या विमानातून ४२ प्रवासी प्रवास करीत होते़
या घटनेनंतर मुंबईला जाणाऱ्या विमानाबरोबरच हैद्राबादला जाणाºया विमानाचे उड्डाणही रद्द करावे लागले. उशीर झाल्याने व शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्याने हैद्राबादचे विमान रद्द करण्यात आले़ यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली़ साईबाबांच्या आशीर्वादाने वाचलो, अशी प्रतिक्रिया विमानातील काही प्रवाशांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत वैमानिकाची चूक दिसते़ विमान योग्य जागेवर लॅन्ड न झाल्याने ही घटना घडली़ यात कोणतीही हानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत़ या घटनेचा अहवाल मागितला आहे़ विमानतळ विकास कंपनीच्या वतीने या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे़
-सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.
जेथे रन-वे संपतो तेथून हे विमान १०० फूट पुढे गेले. परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधनाने पुढील अनर्थ ेटळला.
-विरेन भोसले, संचालक, शिर्डी विमानतळ.