नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला. यानंतर मुनगंटीवार पहिल्यादांच नागपुरात दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुनगंटीवार दाखल झाल्यानंतर शिवप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याच्या संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करारही पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला असून येत्या काळात यासंदर्भात आम्ही विविध उपक्रम राबवणार असल्याचे ते म्हणाले. यतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. हा अभिमानाचा क्षण आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.