– मनपा आयुक्तांचे सक्त आदेश : शहर विद्रुप करणा-यांबाबत कठोर पवित्रा
नागपूर : अवैधरित्या होर्डींग लावून शहर विद्रुप करणा-यांविरोधात नागपूर महानगरपालिकेतर्फे कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. विनापरवानगी अवैधरित्या कुठेही होर्डींग लावणा-यांविरोधात सक्त कारवाईचे आदेश सोमवारी (ता.२) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मनपा आयुक्तांच्या आदेशावरून मंगळवार(ता.३)पासून शहरात सर्वत्र कारवाई केली जाणार आहे.
अवैध होर्डींगबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले होते. शहरात होर्डींगसाठी काही ठिकाणी झाडेही कापण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय झाडांवर, विद्युत खांब, इलेक्ट्रिक डीपी बॉक्स, सिग्नल, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसर व अन्य ठिकाणी कुठेही विना परवानगी होर्डींग लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशाचे पालन करीत मंगळवारपासून शहरातील विविध भागात कारवाई केली जाणार आहे.
दहाही झोनमध्ये ही कारवाई करण्यात येणार असून ज्या ठिकाणी अवैध होर्डींग लावण्यात आले आहेत, ते तात्काळ हटवून शहर विद्रुप करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.