नागपूर: झेंडा, फक्त लढ म्हणा, मोरया यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेला सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर यांनी शुक्रवारी (ता. २२) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील परिवहन कार्यालयाला भेट दिली. परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने नागपुरात सुरू झालेल्या पर्यावरणपूरक बस सेवेचे त्यांनी कौतुक केले. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नागपुरात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त संतोष जुवेकर नागपुरात आलेले आहेत. संतोष जुवेकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. चित्रपट अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासोबत दोन हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका करीत आहेत.
संतोष जुवेकर यांनी महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. महापालिकेद्वारे सुरू असलेले प्रकल्प पथदर्शी आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांला समर्पक उत्तरे त्यांनी दिलीत. कार्यक्रमाचे संचालन योगेश लुंगे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरूण पिपुरडे, परिवहन अभियंता योगेश लुंगे, प्रभव बोकारे, सुनील शुक्ला, बी.आऱ सोनटक्के, रामराव मातकर, विनय भारद्वाज, गिरीश महाजन यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.