नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी, हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांनी मतदानाच्या दिवसापासून तीन दिवस आपल्या आस्थापनांमध्ये मतदाराला विशेष सूट द्यावी असे आवाहन नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात शुक्रवारी (ता: २५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, हॉटेल असोसिएशनचे श्री. तेजेंदर सिंग रेणू, श्री. ऋषी तुली, श्री. अजय जैस्वाल, श्री. तरुण मोटवानी, श्री. मनोज अवचट, श्री. वासूदेव त्रिवेदी, श्री. विशाल जैस्वाल, श्री. नितीन त्रिवेदी, श्री. विनोद जोशी, श्री. विजय चौरसिया, श्री. हरमनजीत सिंग बावेजा, श्री. इंद्रजीत सिंग बावेजा प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी पासूनच हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांना स्वीपच्या माध्यमातून आपल्या आस्थापनेवर येणाऱ्या मतदारांना मतदानाविषयी जागृत करावे, मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, त्याकरिता आपल्या आस्थापनेवर दर्शनीय ठिकाणी जनजागृती फलक लावावेत, तसेच हॉटेल, रेस्टॉरेंट चालकांनी मतदानाच्या दिवसापासून तीन दिवस आपल्या आस्थापनांमध्ये मतदाराला विशेष सूट द्यावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले. यावेळी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत आवश्यक जनजागृती करण्याची ग्वाही दिली.