नागपूर : स्वच्छ व सुरक्षित अन्न पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारत सरकारतर्फे देशभरात १०० ‘फूड स्ट्रीट’ विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, नाशिक आणि ठाणे महानगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. नागपुरातील प्रस्तावित ‘फूड स्ट्रीट’साठी जागेची पाहणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (ता.१४) केली.
‘फूड स्ट्रीट’साठी नागपूर महानगरपालिकेद्वारे हॉटेल रेडीसन ब्ल्यू, नरेंद्र नगर पुलाजवळील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रस्तावित जागेची आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपअभियंता पंकज पाराशर, राजीव गौतम, वास्तुशिल्पकार श्रीमती राशी बावनकुळे उपस्थित होते.
नरेंद्र नगर पुलाजवळील मनपाच्या जागेवर ‘नागपूर स्मार्ट फुड हब’ प्रस्तावित करण्यात आले आहे. इथे आधुनिक तंत्रज्ञानाने २० स्टॉल तयार करण्यात येतील. यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (NUHM) अंतर्गत एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे.
पाहणी प्रसंगी आयुक्तांनी या जागेवर प्रस्तावित ‘फुड हब’ तयार करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.