मेडिकलमध्ये झाले लसीकरण : नोंदणी झालेल्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.२४) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेतले. यावेळी आयुक्तांना ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात आली.
या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, प्रभारी अधिष्ठाता डॉ.आर.पी.सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘कोव्हॅक्सिन’ व अन्य २० रुग्णालयांमध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लसीकरणासाठी ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशा सर्व फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित दिवशी व ठिकाणी लसीकरण करून घ्यावे. तसेच ज्यांच्या लसीकरणाचा पहिला डोज झालेला आहे त्यांनी २८ दिवसानंतर दुसरा डोज घ्यावा आणि कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून स्वत:ला व परिवाराला सुरक्षित करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मनपातील बहुतांश अधिकारी, कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.