फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी तलावाला दिली भेट
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सर्व तलाव बंद करण्यात आले असून या तलाव परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत. या कुंडांची आणि व्यवस्थेची मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. पाहणी केली.
आयुक्तांनी मंगळवारी (ता. ६) फुटाळा तलाव आणि बुधवारी (ता.७) सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी तलावांना भेट दिली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. अशोक पाटील, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी आदी उपस्थित होते. फुटाळा तलाव परिसरात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल आणि फाऊंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.
फुटाळा तलाव परिसरात जनजागृती करणाऱ्या ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांशी मनपा आयुक्तांनी यावेळी संवाद साधला. शहरातील सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशासह विसर्जन कुंडांची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था यासंबंधी त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.