नागपूर: प्रशासकीय इमारतीतील प्रत्येक विभागात स्वच्छता असायलाच हवी. त्यात कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे. कुठेही अनियमितता आढळून आल्यास विभागप्रमुखांवरच कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला.
मनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता. ८) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांना आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेश रहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी प्रारंभी सामान्य प्रशासन विभाग, लेखा व वित्त विभाग, कर संकलन व कर आकारणी विभाग, स्थानीय संस्था कर विभाग (एलबीटी) आणि नगररचना विभागात भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. कामकाज कसे चालते याची माहिती जाणून घेतली. तेथील शौचालये अस्वच्छ असल्याने ते त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. महिन्याच्या अखेरीस वर्कशीट, लॉग रिपोर्टचा गोषवारा व्यवस्थितपणे तयार करण्यात यावा, महत्त्वाची कागदपत्रे फाईल क्रमवार कपाटात ठेवण्यात यावी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेवर कार्यालयात यावे, दररोज प्राप्त झालेल्या अर्जाचा वेळेवर निपटारा लावा, असे आदेश दिले. पुढच्या पंधरा दिवसात सर्व कागदपत्रे अद्ययावत व सुरळीत करण्यात यावी, असेही आयुक्त यांनी सांगितले.
अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाचे फलक व त्यांच्याकडे असलेले कार्यविवरण हे दर्शनी भागात लावण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. मनपाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटीस सूचना भिंतीवर न लावता फलकावर लावण्यात याव्या, अशाही सूचना त्यांनी केल्या. इमारतीत अग्निशमन यंत्रणा सुसज्ज व अद्ययावत करण्याचे व त्याची एक वेळा तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. फाईल्स क्रमवार लावाव्यात. संबंधितांकडून सफाई व स्वच्छता करून घ्यावी. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, अशी ताकीद संबंधित विभागप्रमुखांना दिली.
त्यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेतली. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी कार्यालयात अनुपस्थित कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेऊन उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले.