नागपूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराचे तापमान वाढायला सुरुवात होते. त्यामुळे शाळा दिवसभर सुरु ठेवणे शक्य नाही. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवार १ एप्रिल २०२२ पासून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळातील इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता. ३०) जारी केले.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून सर्व आस्थापना/ कार्यक्रमावरील कोरोना विषयक निर्बंध टप्या-टप्याने उठविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सदर आदेश देण्यात आलेले आहेत. रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरु ठेवता येईल. इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा, सकाळच्या सत्रात शाळा घेण्यात येत असल्याने अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात तसेच दररोज १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सदर आदेशांचे पालन मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.