नागपूर: नागपूर महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विविध योजनेअंतर्गत शहरातील ६ दिव्यांग लाभार्थ्यांना मंगळवारी
(ता. २) महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते बॅटरी मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. यावेळी १२ पात्र लाभार्थ्यांपैकी उपस्थित ६ लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. २) मनपा आणि समाजविकास विभागातर्फे धनत्रयोदशीचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात ट्रायसिकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, मनपा उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांच्या विविध कल्याणकारी योजनांकरिता ७.५ कोटी रुपयाचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांचे आयुष्य स्वावलंबी बनविण्यासाठी मनपातर्फे विविध योजना राबविल्या जातात. याअंतर्गत अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग बांधवांना आवागमनामध्ये सुलभता प्रदान व्हावी याउद्देशाने दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ४० हजार रुपये किंमतीच्या मोटराइज्ड ट्रायसिकल प्रदान करण्यात आल्या. दिव्यांग बांधवानी या ट्रायसिकलचा उपयोग चांगल्या कामासाठी स्वतःसाठी करावा अशी, अपेक्षा व्यक्त करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व नागपूरकरांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन नूतन मोरे यांनी केले.