स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मनपाचे सेवाकार्य
नागपूर: कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रवीभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षा या सर्वांबाबत मनपाद्वारे आस्थेने काळजी घेण्यात येत आहे.
शहरातील विविध विलगीकरण कक्षांपैकी सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतीगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे.
वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टिम सेवा देत आहेत. ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लीम बांधव असून त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी मनपातर्फे भोजन व्यवस्था करण्यात येत आहे शिवाय नागरिकांसाठी बेड, चादर, उशी, पांघरून ही सर्व व्यवस्थाही मनपाने करून दिली आहे.
पाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टॉफ, परिचारीका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विंगमध्ये निवासाला असणा-या नागरिकांना मनपातर्फे टॉवेल, बकेट, ग्लास, टूथब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायजर, पाण्याची कॅन, लहान मुलांसाठी दुध या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे.
तर व्हीएनआयटीच्या चार वसतीगृहामध्ये सुमारे ६०० संशयीतांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणीही सर्व रहिवाशांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा तसेच आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत असून त्यांचे कोरोना ‘स्वॅब’ घेण्यात येते. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जाते. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी ‘स्वॅब’ घेण्यात येतो. तो अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुट्टी देण्यात येते.
या कार्यासाठी मनपाच्या अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल अधिका-यांचे पथक अहोरात्र कार्य करीत असून विलगीकरणातील नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होउ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.