नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे अनेक वर्षांपासून विज्ञान मेळावाचे आयोजन केल्या जाते. या मेळाव्याला मी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतो. महानगरपालिका, जिल्हा पंचायतच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध उत्तम लॅबोरेटरीज तुलनेत कमी असतात. या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी, म्हणून मी या शाळांसाठी उत्तम लॅबोरेटरीज आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विज्ञान मेळाव्यात बोलताना केले.
अपूर्व विज्ञान मेळावा उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदासपेठ येथील राष्ट्रभाषा भवन येथे दिनांक 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित केला आहे.
यावेळी असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग बेसिक सायन्स एज्युकेशनचे सचिव सुरेश अग्रवाल, सेवानिवृत्त शिक्षक व्ही. एस. एस. शास्त्री, अलाहाबाद येथील ओ. पी. गुप्ता, शिक्षिका श्रीमती ज्योती मेडपिलवार, वंदना चव्हाण, छाया कोरासे, दीप्ती बीस्ट, डॉ. मनीषा मोगलेवार, निलिमा अढाऊ, निता गडेकर, कुसुम जामेवार, सुनीता गुजर, पुष्पा गावंडे उपस्थित होत्या.
असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग बेसिक सायन्स एज्युकेशनचे सचिव सुरेश अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ आयोजित केला जात आहे. ‘आओ करे विज्ञान से दोस्ती’ संकल्पनेवर आधारित या मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण व्हावी यासाठी आहे. मेळाव्यात 35 शाळांमधील 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विज्ञानातील 100 प्रयोगांचे सादरीकरण केले आहे. सहावी ते बारावीतील अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित विषयांतील प्रयोगांचा समावेश आहे.
विज्ञानाला जवळून समजून घेण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगाची आवश्यकता असते. परंतु, वैज्ञानिक प्रयोग करायचे असल्यास त्यासाठी मोठी लॅब, यंत्रसामग्री लागणार हा गैरसमज दूर करीत, घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करुनही विज्ञानातील प्रयोग अधोरेखित करता येतात. याची प्रचिती अपूर्व विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दिली. मनपाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आत्माविश्वासाने विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग सादर करत नागपूरकरांची दाद मिळविली आहे. घरघुती बॅरोमीटर, मिनी जनरेटर, पेरिस्कोप, गुरुत्वकेंद्र, विद्युत मीटर, न्यूटन डिश आदी लक्षवेधी प्रयोग विद्यार्थ्यांनी साकारले आहेत.