वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बेघर निवारा केंद्रात दिला १५ गृहहीनांना आश्रय
नागपूर : कधी कधी परिस्थिती व्यक्तीला अशा अवस्थेत आणून सोडते, जिथे त्या व्यक्तीला कुणाचाही आधार मिळत नाही, त्याला आपले आयुष्य भटकत, उघड्यावर जगावं लागते. संत्रानगरीतही रस्त्यांच्या शेजारी, पूलाखाली, उघड्यावर वास्तव्य करणारे अनेक बेघर आहेत. ते गृहहीन असले तरी त्यांना देखील आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने बुधवारी ७ डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित १५ गृहहीनांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.
नागपूर शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या शेजारी पूलाखाली व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये नेण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी ७ डिसेंबरच्या रात्री मिठा नीम दर्गा येथून ११ आणि वर्धा रोडवरील पुलाजवळून ४ अशा एकूण १५ व्यक्तींना मनपाच्या आपली बसच्या मदतीने निवारा केंद्रात नेवून आश्रय दिला. याशिवाय निवारा चमूच्या सदस्यांनी संविधान चौक स्थित पेट्रोल पंपाजवळील असणाऱ्या २० राजस्थानी कुटुंबांचे त्यांच्या घरी परतण्यासाठी समुपदेशन केले. असे करीत कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दर्शविली. समाजविकास विभागाचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे आणि समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाचे कर्मचारी काम करीत आहे.
बेघरांकरिता नागरिकांना आवाहन
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे गरीब व गरजू बेघरांसाठी मूलभूत सोयी सुविधा (पलंग, गादी, बेडशीट, ब्लॅंकेट आदि) २८० बेडची क्षमता असलेले बेघर निवारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ६० वर्षावरील वृद्धांना मोफत तसेच इतर शहरी बेघरांना माफक दरात भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे वैद्यकीय तपासणिची सुध्दा व्यवस्था करण्यात येत आहे. नागपूर शहरात मनपाच्या बुटी कन्या शाळा, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, रेल्वे स्टेशन पुलाच्या खाली, गणेश टेकडी जवळ, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा टिमकी भांनखेडा, सतरंजीपुरा झोन जुनी इमारत, समाज भवन इंदोरा मठ मोहल्ला, समाज भवन इंदोरा मठ मोहल्ला नवीन इमारत असे शहरात सहा ठिकाणी बेघरांसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा युक्त २४ तास व्यवस्था असलेले शहरी बेघर निवारे आहेत.
मनपा व पोलिस विभागद्वारे बेघरांना निवारागृहात रात्रकालिन ड्राइव च्या माध्यमातून आणण्यात येत आहे. सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती यांना नागपुर शहरामधील बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच इतरत्र भोजन, ब्लेंकेट आदि वाटप न करता निवऱ्यातील बेघरांना द्यायचे असल्यास त्यांनी निवारा व्यवस्थापक श्री दीपक पसारकर मोबाईल क्रमांक 9960183143 व श्री वसंत रंगारी मोबाईल 9595915401 यांचेसोबत संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फ़त करण्यात आले आहे.