नागपूर : मनपातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्याने लवकरच महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बँक’ सुरू होणार आहे. मनपा शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अगदी मोफत सायकलचा लाभ घेता येईल, अशी माहिती मनपाच्या शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित शिक्षण विशेष समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती स्नेहल बिहारे, सदस्य विजय उर्फ पिंटू झलके, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी,उज्ज्वला बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होत्या.
सायकल बँक योजना ही मनपा शाळांतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे. दूरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव पारीत झाला असून त्यावरील कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचेही सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सांगितले.
मनपा शाळांतील माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तातडीने तयार करण्यात यावी, डुप्लीकेट टी.सी. देण्याकरिता जुने रेकॉर्ड स्कॅनिंग करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, मनपाच्या बंद असलेल्या शाळा ज्या संस्थांना देण्यात आलेल्या आहेत त्यांचे भाडे निर्धाण व फेरमूल्यांकनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, माध्यमिक शाळेकरिता बेंच खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊन १५ दिवसांत त्यासंदर्भात निविदा काढण्यात यावी, असे निर्देश सभापती प्रा. दिवे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शाळा निरीक्षकांनी मागील बैठकीपासून आतापर्यंत शाळांना दिलेल्या भेटीचा अहवाल दहाही झोनच्या शाळा निरीक्षकांकडून घेण्यात आला. मनपाच्या शिक्षण विभागातर्फे ९ जानेवारीपासून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. सुरक्षा रक्षक नियुक्तीसंदर्भातील सुधारीत प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला दहाही झोनचे शाळा निरीक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.