नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची सुविधा, सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन मुलभूत सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य समारंभ होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दीक्षाभूमीवर येणाऱ्या मार्गांवर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी ८०० च्या वर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात आलेल्या आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये या संपूर्ण व्यवस्थेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व व्यवस्थांच्या संदर्भात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण देशातून दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या सर्वांना कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी मनपाद्वारे संपूर्ण यंत्रणा सुविधापूर्णक व्यवस्थेची हाताळणी करीत आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय बाहेरून येणाऱ्या अनुयायांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी किंवा कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाद्वारे विशेष ‘आपली बस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. काछीपुरा चौकामध्ये ‘आपली बस’चे बस स्थानक देखील उभारण्यात येणार आहे.
८०० सफाई कर्मचाऱ्यांची सेवा, १२० नळांची व्यवस्था
दीक्षाभूमी परिसरामध्ये सतत स्वच्छता राखली जाईल यासाठी ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय तीन पाळीमध्ये एकूण ८०० स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दीक्षाभूमी मार्गावर पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी १२० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे १० हजार चौ.फुट जागेमध्ये वॉटर प्रुफ निवारा / विश्रांती गृहाची निर्मिती मनपाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय आपात्कालीन स्थितीमध्ये दीक्षाभूमी जवळील शाळांमध्ये निवारा व्यवस्था करण्यात येणार आहे.
९५० पेक्षा अधिक शौचालय
मुलभूत सुविधांमध्ये महिला आणि पुरूषांसाठी ९५० पेक्षा अधिक स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आयटीआय परिसर, आरोग्य उपसंचालक कार्यालय (माता कचेरी) आणि कारागृहाच्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे. पुरुष आणि महिलांकरीता प्रत्येकी २५ असे एकुण ५० स्नानगृहाची व्यवस्था आयटीआय परिसारामध्ये करण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक शेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून हे कक्ष २४ तास कार्यरत असणार आहे. यासाठी आयुक्तांद्वारे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.
कचरा रस्त्यावर नव्हे, कचराकुंडीतच टाका
दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. नागरिकांनी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी सेवारत राहणार आहेत. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यावर अथवा इतरत्र कुठेही कचरा न टाकता तो परिसरातील कचरा कुंडीमध्येच टाकावे व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.