Published On : Thu, Nov 9th, 2017

मुन्ना यादव कुख्यात गुन्हेगार, करण-अर्जुनला अटकपूर्व जामीन नाकारला

Munna-Yadavफटाके फोडण्यावरून झालेल्या वादात पापा यादव व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप नेता मुन्ना यादवची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० हजारांच्या वैयक्तिक जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, तिची मुले करण व अर्जुन या दोघांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे घेतला.

अजनी चौकात यादव कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पापा यादव याने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुन्ना यादव, त्याची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव, मुले करण व अर्जुन यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता लक्ष्मी व तिच्या मुलांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्याने तिघांनी उच्च न्यायालयातील न्या. अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठासमोर अर्ज सादर केला. न्यायालयाने यापूर्वी अर्जावर सुनावणी करताना लक्ष्मीला अटकपूर्व जामीन दिला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली असता धंतोली पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारे शपथपत्र दाखल केले.

Gold Rate
Friday 31 Jan. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकारी वकील क्षितिज धर्माधिकारी व अॅड. रजनीश व्यास यांनी न्यायालयास सांगितले की, अजनी चौकात राहणारा भाजपचा नेता मुन्ना यादव याचा मुलगा करण यादव हा पापा यादव याच्या घरासमोर २८ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडत होता. तेव्हा मंजू यादव हिने करणला हटकले. तेव्हा मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, बाला यादव, करण व अर्जुन यादव तसेच त्याच्या कुटुंबीयांनी पापा यादवच्या घरावर हल्ला केला. मंजू यादवला जखमी केले. मंजूने सदर बाब पापा यादवला कळविली. तेव्हा पापा यादव घटनास्थळी पोहोचला व त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुन्ना यादव व त्याच्या कुटुंबीयांनी पापा यादवला घरातून बाहेर खेचले आणि त्यालाही बेदम मारहाण केली. तर करण यादवने फायटरने पापा यादवच्या डोक्यावर वार केला. तेव्हा अर्जुन ‘पापा यादवला येथेच संपवून टाक’, म्हणून करणला चेतवित होता, असेही न्यायालयास कळविण्यात आले.

पापा यादवला मारहाण सुरू असतानाच मंगल यादव आणि करण मुदलीयार यांनीही मध्यस्थी केली. परंतु, मुन्ना, लक्ष्मी यादव व मुलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मंगल यादवला तलवारीने मारहाण करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला कळविले आहे.

दरम्यान, सरकारी पक्षाचा युक्तिवाद एकल्यानंतर न्या. चांदूरकर यांनी करण आणि अर्जुन या दोघांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट केले. तेव्हा दुपारच्या अवकाशानंतर यादव कुटुंबीयांची बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी करण व अर्जुन यांचा अर्ज मागे घेत असल्याचे न्यायालयास सांगितले. तेव्हा न्यायालयाने लक्ष्मी यादवला २० हजाराच्या जामीनावर अटकपूर्व जामीन मजूर केला. तसेच तिला याप्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराला भयभीत करू नये अथवा पुरावे नष्ट करू नये, अशी अट घालण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचाही आदेश दिला आहे.

‘मुन्ना यादव कुख्यात गुन्हेगार’

भाजपचा नेता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती मानला जाणारा मुन्ना यादव तसेच याप्रकरणातील इतर आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत, असा अहवालच पोलिस उपनिरीक्षक अनंतराव वडतकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. हल्ला प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग आणि मंगल यादवला मारहाणीसाठी वापरलेली तलवारदेखील जप्त करायची असल्याने आरोपींची पोलिस कोठडी घेणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी कळविले आहे.

Advertisement