नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१३) दुर्गुणांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदावर लिहिले आणि त्याचे होळीसोबत दहन केले. आपल्यातील दुर्गुणांचे दहन करुन नियमित चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये अनेक वाईट सवयी अथवा दुर्गुण असतात. खोटे बोलणे, चोरी करणे, आज्ञा न पाळणे, मोबाईलवर घातक खेळ खेळणे, स्वच्छता न राखणे, मारामारी करणे, शिव्या देणे वगैरे या सर्व दुर्गुणांचे दहन करुन विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याची संकल्पना प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांनी मांडली. त्यानुसार विद्यार्थ्यांचे सुमारे १५ दुर्गुण एकेका कागदावर लिहिण्यात आले. हे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देउन त्यांनी या सर्व दुर्गुणांना मनातून, आचरणातून काढून टाकण्यासाठी, विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी ‘होळी रे होळी दुर्गुणांची होळी’ अशा आवेशपूर्ण घोषात त्यांच्याकडूनच ही दुर्गुणांची होळी करण्यात आली.
फुलांची उधळण आणि एकमेकांना गुलाल लावून होळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. गवरे, श्री. चावरे, श्री. शेंडे, श्रीमती मोहरीर, श्रीमती घायवाट, श्रीमती हटवार, श्री. उरकुडे, श्री. बबनराव चौधरी तसेच माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.