नागपूर :शहरात गुन्हेगारीचं सत्र थांबायचं नाव घेत नाही. यावेळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री एका युवकाची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मृत युवकाचं नाव शेरा सूर्यप्रकाश मलिक (वय ३२, रा. ठक्करग्राम, पाचपावली) असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गीतेश उर्फ रजत ऊके (वय ३३) आणि त्याचा साथीदार भोजराज मोरेश्वर कुंभारे (वय ३२), दोघेही पाचपावलीतील रहिवासी, यांनी शेरा मलिक याच्यावर चाकूने १२ ते १५ वार करत हत्या केली. ही घटना शेरा याच्या राहत्या घराजवळच घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी गीतेशचा शेऱाच्या पत्नीसोबत मागील दोन वर्षांपासून बेकायदेशीर संबंध होता. ही बाब शेराला समजल्यावर दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. अखेर याच वादातून गीतेशने शेराला संपवण्याचा कट रचला आणि भोजराजच्या मदतीने त्याची हत्या केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना घटनास्थळीच अटक केली आहे. पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या निर्घृण हत्येनंतर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूर शहरात सातत्याने घडणाऱ्या हत्या आणि गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून शहरात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचं आवाहन केलं आहे.