नागपूर : बॉलिवूडचा सगळ्यात व्यस्त पार्श्वगायक आणि स्टेज शो परफॉर्मर ‘व्हाईस ऑफ युथ’ शांतनु मुखर्जी अर्थात शान, सोबतीला वाद्यांचा कर्णमधूर साज चढवीत कित्येक सुपरहिट गीतांचा नजराणा देणाऱ्या संगीतकार ‘जतीन-ललित’ जोडगळीतील ललित पंडित आणि ‘मेलोडियस क्वीन ऑफ बॉलिवूड’चा किताब पटकावणारी ज्येष्ठ गायिका साधना सरगम या त्रिकूटाने तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला चार चांद लावत नागपूरकर रसिकांवर सप्तस्वरांची मोहिनी घातली.
हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसºया दिवसाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी, डॉ. गिरीश गांधी, महापौर संदीप जोशी, आ. नागो गाणार, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल, भाजपा विदर्भ प्रदेश संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, बाबूराव तिडके, संदीप जाधव, राजेश बागडी, शिवानी दाणी, कीर्तीदा अजमेरा, चेतन कायरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, आशिष वांदे, जितू ठाकूर, राहुल खंगर, अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी साधना सरगम, ललित पंडित व शान यांचा सत्कार करण्यात आला. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.
उद्घाटनानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाची सगळी सूत्रे संगीतकार ललित पंडित यांनी घेतली आणि धमाकेदार कार्यक्रमास सुरुवात झाली. तिघांनीही गाजलेली नवी-जुनी गाणी सादर केली आणि त्या गाण्यांच्या निर्मितीची कथा आणि इतर आठवणी सांगत त्रिकुटाने ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’आणखी खुलवला. सुरुवात सहगायिका अनुप्रिया चॅटर्जी हिने ‘मेरे ख्वाबो में जो आये’ या गाण्याने केली आणि सुरुवातीपासूनच रंग चढविण्यास सुरुवात केली. ललित पंडित यांनी स्वत:च्या संगीतकार कारकिर्दीचा इतिहास उलगडताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटातील ‘न जाने मेरे दिल को क्या हो गया’ या गाण्याचा किस्सा उजागर केला.
हे माझे पहिलेच गाणे लतादीदी यांनी गाऊन माझ्या कारकिर्दीचा शुभारंभ केल्याचे पंडित म्हणाले. विशेष म्हणजे, दोन धृपदाला जोडून हे गाणे चित्रपटात घेण्याचा आग्रह प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते यश चोपडा यांनी केल्यानंतर हे गाणं आकाराला आल्याचे ते म्हणाले. त्यानंतर रंगमंचावर अवतरलेल्या साधना सरगम यांनी छान अस्खलित मराठीत नागपूरकरांशी संवाद साधला तर, चिरपरिचित अंदाजात शानचे रंगमंचावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तिघांनीही मिळून सुरेल बॉलिवूड गीतांची बरसात करत नागपूरकर रसिकांना रिझविले. ललित पंडित यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच जुन्या गीतांच्या सादरीकरणाने या त्रिकूटाने रसिकांना भुरळ घातली. त्यांना की-बोर्डवर संजय मराठे, रोहांश पंडित, लीड गिटारवर लोकेश बक्षी, ड्रम्सवर जतीन पन्सानिया, तालवाद्यावर अबीर पंडित, ढोलकवर सतीश तामणकर, ऑक्टोपॅडवर संतोष भूतल, बेस गिटावर गौतम शिंदे यांनी संगत केली.
‘कसं काय नागपूर… माझा प्लॅनिंग तुम्हाला नक्की आवडेल’
पार्श्वगायक शानची जादू युवावर्गावर प्रचंड चालते. याचा अंदाज आज उसळलेल्या युवकांच्या गर्दीवरून घेता येत होता. शानचे आगमन होताच चाहत्यांनी एकच गजर करत स्वागत केले. प्रत्युत्तरात ‘कसं काय नागपूर’ म्हणत शानने रसिकांना आश्चर्यचकित करून सोडले. तुटक तुटक मराठी बोलत ‘माझा प्लॅनिंग तुम्हाला नक्की आवडेल’ असे म्हणत चक्क ‘अश्विनी ये ना, जगू कसा तुझ्या विना राणी गं’ हे धमाकेदार गीत सादर करत नागपूरकर चाहत्यांना थिरकण्यास भाग पाडले.
शिवाय, चाहत्यांच्या मनात आजही घर करून असलेली किशोरदा यांची मेलोडियस गाणी सादर करत रसिकांना ताल धरण्यास बाध्य केले. शिवाय, स्वत:च्या आवाजातील गाणी सादर करत नागपूरकरांच्या पसंतीची परीक्षाही त्याने घेतली. ‘चांद शिफारीश जो करता हजारी’ या गीताचा स्वर असा काही लावला की प्रत्यक्ष स्वत: संगीतबद्ध केलेल्या ललित पंडित यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ‘वाह क्या बात है’ अशी दाद निघाली. ‘इथे संत्रा पण हाय आणि संस्कृती पण’ असे म्हणजे नागपूर व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा गौरवही केला.
साधनेच्या सरगममध्ये रसिक न्हाऊन निघाले
साधना सरगम यांनी ललित पंडित व शान यांच्यासोबत गाणी सादर करत रसिकांना स्वत:च्या आवाजाची भुरळ पाडली. मराठीमध्ये संवाद साधत नागपूरचे असलेले नाते त्यांनी अधिक घट्ट केले. माझी वहिनी ही नागपूरचीच असल्याने नागपूरविषयीचे आकर्षण नेहमीच राहिल्याचे त्या म्हणाल्या. निले निले अंबर पे, सात समंदर पार मैं तेरे, बस इतना सा ख्वाब है आदी गाणी सादर करत रसिकांच्या मनाचा ताबा लीलया घेतला.
ललित पंडित घराण्याची पाचवी संगीतकार पिढीही होती सोबत
ललित पंडित यांनी स्वत:च्या सांगितिक घराण्याचा परिचय यावेळी करवून दिला. मी नेवाती घराण्यातील माझे गुरू पं. जसराज यांचा पुतण्या असून, आमच्या घराण्यातील पाचवी पिढी म्हणजे माझा मुलगा रोहांश पंडितही संगीत क्षेत्रात कार्यरत आहे आणि तो माझ्यासोबत या महोत्सवात की-बोर्डवर कमाल करत असल्याचा परिचय पंडित यांनी दिला. ज्या प्रमाणे मला तुम्ही आशीर्वाद दिला तसाच आमच्या घराण्याच्या पाचव्या पिढीलाही देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
दीपप्रज्वलनानंतर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी ललित पंडित, साधना सरगम व शान यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर, पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे बघून तिघांनीही नितीन गडकरी व विजय दर्डा यांचे आभार मानले. आयोजक दीपप्रज्वलन करून निघून जातात आणि कार्यक्रम सुरू असतो. मात्र, गडकरी व दर्डा पूर्णवेळ बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत, असे चित्र आम्ही प्रथमच बघत असल्याचे तिघेही यावेळी म्हणाले.