वाराणसी – देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बद्दल अनेक प्रकारच्या चर्चा होत असतात. काही लोक संघाला देशभक्त आणि सामाजिक संघटना मानतात, तर काही लोक त्याला संकुचित विचारसरणीचा प्रतिनिधी मानतात. नेहमीच एक प्रश्न विचारला जातो – मुस्लिम संघात का नसतात? आणि मुस्लिम व्यक्तीला संघात प्रवेश मिळू शकतो का?
याच प्रश्नावर आता सरळपणे उत्तर दिलं आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी. वाराणसी दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं, “प्रत्येक भारतीयाला संघाच्या शाखांमध्ये सहभागी होता येऊ शकतं. पण यासाठी एक अट पूर्ण करावी लागेल.”
भागवत म्हणाले, “जो मुस्लिम ‘भारत माता की जय’ म्हणण्यात संकोच करत नाही आणि भगवा ध्वजाचा आदर करतो, त्याचं संघात स्वागत आहे.” म्हणजेच, कोणतीही व्यक्ती धर्म काहीही असो, जर त्याला देश, भगवा आणि भारतमातेविषयी अभिमान आहे, तर तो संघात सामील होऊ शकतो.
नागर कॉलनी येथील संघ शाखेच्या भेटीदरम्यान त्यांनी जातीय भेदभाव, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि मजबूत समाज रचनेसंबंधी देखील चर्चा केली.
भागवत पुढे म्हणाले, आपल्या देशात धर्म वेगवेगळे असले तरी आपली संस्कृती एकच आहे. भारतात सर्व धर्म, पंथ आणि जातींच्या लोकांचं संघाच्या प्रत्येक शाखेत स्वागत आहे. ही घोषणा देशात नवीन सामाजिक संवादाची दारे उघडते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.