नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी रोजी देशभरात जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फेदेखील आपल्या समाज बांधवाना या ऐतिहासिक सोहळयात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांनीदेखील कमीत कमी ११ वेळा रामनामाचा जयघोष करून जगासमोर सामाजिक एकतेचा संदेश द्यावा, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी २०२३ च्या अखेरीस नवी दिल्लीत याबाबत बैठक घेऊन समाजबांधवांना आवाहन केले होते. त्यानंतर देशपातळीवर मंचच्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून समाज बांधवांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार देशातील बऱ्याच मशीदी, मदरसे यांच्यासह मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतली जात आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचानेदेखील राम मंदिर विस्तारात मोठे सहकार्य केले आहे. निधी संग्रहात देखी मंचाचा मोठा वाटा आहे. अयोध्येच्या जवळपासच्या भागातून राममंदिरापर्यंत मुस्लिम बांधवांनी पायी मार्च काढून पोहोचावे असेदेखील आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला अनेक मुस्लिम तरुणांनी प्रतिसाद दिला.
मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या पुढाकारामुळे भारतातील सामाजिक सामनतेचा संदेश जगासमोर येत असल्याचे इंद्रेश कुमार म्हणाले.