Published On : Tue, Sep 22nd, 2020

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य पथकास सहकार्य करा- पालकमंत्र्यांचे जिल्हावासियांना आवाहन

Advertisement

भंडारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान न राहता लोकचळवळ झाली पाहिजे याकरीता जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कडन यांनी केले आहे.

या अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरातील मोहल्ल्यात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहे. हे पथक तपासणीसाठी घरी आल्यानंतर नागरीकांनी त्यांना कुटूंबाची सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच पथकांना कुटूंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास अथवा कोणताही जुना आजार असल्यास त्याची खरी माहिती द्यावी, जेणेकरुन आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यास जिल्हा प्रशासनाला मदत होईल.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे, आरोग्य शिक्षण साधने हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे कदम यांनी सांगितले. जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी, त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयीत रुग्ण शोधने, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्या विषयी जागृती करणे या बाबी मोहिमेत राबविल्या जाणार आहेत. मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम वैयक्तिक, कैटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निर्जंतुकीकरणचा योग्य वापर करणे या बाबातचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरीकांनी कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच तातडीने आपल्या नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. नागरीकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे, घराच्या बाहेर पडताना मास्कचा व सॅनिटाझरचा वापर करणे या त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन करुन जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना नागरीकांच्या सहकार्याची जोड मिळाल्यास जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करणे सहज शक्य होईल. असा विश्वासही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement