डागा स्मृती महिला रुग्णालयात मेट्रो संवाद
नागपूर : नुकतेच महा मेट्रोने सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान पहिली टेस्ट रन घेतली असून लवकरच या भागातील नागरिकांना मेट्रोने प्रवास करायला मिळणार आहे. याच अनुषंगाने या मार्गिकांवरील नागरिकांना मेट्रो संबंधी माहिती देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी मेट्रो संवाद कार्यक्रम महामेट्रो नागपूरच्या वतीने राबवला जात आहे. रिच-४ मार्गिकेजवळ असणाऱ्या डागा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर तसेच कर्मचाऱ्यांसमवेत मेट्रो संवाद घेण्यात आला. डागा रुग्णालय गर्भवती महिलांसाठी आणि बाळंतपणासाठी असल्याने या रुग्णालयात नियमित येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या मोठी आहे तसेच कमी खर्चाच्या हेतूने या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या निर्धन लोकांची संख्या जास्ती असल्यानं, जवळच सुरु होणाऱ्या मेट्रो प्रवासामुळे रुग्णालयात नियमित येणाऱ्यांसाठी मेट्रोप्रवास सुलभ आणि सोयीचा आणि सुरक्षित देखील ठरणार असल्याचे यावेळी डागाच्या अधीक्षिका डॉ. सीमा पारवेकर ह्यांनी बोलून दाखवले.
डाग रुग्णालयातील परिचारिकांबरोबरही मेट्रो संवाद साधण्यात आला. नागपूरच्या विविध भागातून नियमित रुग्णालयात येणाऱ्या अनेक परिचारिकांनी आणि डॉक्टरांनी जवळच मेट्रो सेवा सुरु होणार असल्याचे आणि त्यासोबत असलेल्या अनेक फीडर सेवांच्या बाबत समाधान व्यक्त केले. संवादादरम्यान महा मेट्रो अधिकाऱ्यांनी महाकार्ड, मेट्रो सर्व्हिसेस आणि एंड टू एन्ड कनेक्टिव्हिटी विषयी सविस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले. मेट्रो सेवा, जसे स्टेशन, रेल्वेचे वेळापत्रक आणि इतर माहिती देखील सांगण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांनी, मेडिकल विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिले की ते सगळे नागपूर मेट्रोने प्रवास करतील आणि वैयक्तिक किंवा खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी प्रमाणात करून निसर्ग संवर्धनास हातभार लावतील.. उपस्थित मान्यवर डिक्टारांनीही मेट्रो ट्रेन सेवांचा व्यापक वापर आणि फीडर सेवेद्वारे शेवटच्या मैलांपर्यंत महा मेट्रो सेवेचा वापर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी महा मेट्रोचे व्यावसायिक व्यवस्थापक श्री एस.जी राव उपस्थित होते.
रीच ४ हे नागपूरमधील इतवारी, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू इत्यादी शीर्ष व्यावसायिक भागांना उर्वरित शहराशी जोडेल. तसेच शहरातील अव्वल व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीजीजीसीएच) (मेयो हॉस्पिटल), नागपूर रेल्वे स्थानक, संत्रा मार्केट, शहरातील मुख्य फळ बाजार, महात्मा फुले मार्केट, गांधीबाग, मस्कासाथ आणि इतवारी घाऊक बाजारपेठ आणि सेंट्रल एव्हेन्यू या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या मार्गिका यांना स्वस्त आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल.