मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला कुख्यात गुंड अबू सलेम याने आता स्वतःची २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सलेमने न्यायालयाला सांगितले की, त्याची शिक्षा ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाली असून, त्याला आता तुरुंगातून मुक्त करण्यात यावे.
सध्या अबू सलेम नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्याच्या वकील फरहाना शहा यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.
याचिकेत ११ जुलै २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आणि त्यातील महत्त्वपूर्ण टिप्पण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुर्तगाल सरकारकडून भारतात प्रत्यार्पण करताना अबू सलेमला २५ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही, असा शब्द भारताने दिला होता. यासंदर्भातील कागदपत्रे शिक्षा पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
सलेमच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, त्याच्या चांगल्या वर्तन आणि नियमांचे पालन लक्षात घेता त्याची अटकेपूर्वीच मुक्तता होणे अपेक्षित होते. न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारकडून या संदर्भात स्पष्ट उत्तर मागवले असून, सलेमची अचूक मुक्ततेची तारीख काय असेल, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
अबू सलेमचा जन्म १९६२ साली झाला असून सध्या त्याचे वय सुमारे ६३ वर्ष आहे. एकेकाळी अभिनेत्री मोनिका बेदीसोबतच्या त्याच्या नात्यामुळेही तो चर्चेत राहिला होता.