Published On : Mon, Jan 28th, 2019

महादुला नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा, राजेश रंगारी नगराध्यक्ष म्हणून विजयी

Advertisement

नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघातील महादुला नगर पंचायतीच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला असून नगर पंचायतीवर भाजपाने कब्जा केला. नगराध्यक्ष पदावर भाजपाचे राजेश रंगारी यांचा विजय झाला असून एकूण 17 सदस्यांपैकी भाजपाचे 11 सदस्य विजयी झाले आहे. या विजयामुळे काँग्रेसला पुन्हा एका झटका लागला आहे.

महादुला नपच्या निवडणुकीत भाजपाचे राजेश रंगारी यांनी 4163 मते घेतली तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार रत्नदीप रंगारी यांनी 3883 मते घेतली. अटीतटीच्या या लढतीत 280 मतांनी राजेश रंगारी विजयी झाले. अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार पवन पखिड्डे यांनी 2809 मते घेऊन चांगली टक्कर दिली. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी कमालीचा जोर लावत नगरपंचायत भाजपाच्या कब्जात ठेवण्यात यश मिळविले.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या निवडणुकी प्रभाग 1 मधून धनंजय भालेराव यांनी 490 मते घेऊन अपक्ष उमेदवार सुरज उपाध्याय यांचा 307 मतांनी पराभव केला. प्रभाग 2 भाजपाचे स्वप्नील थोटे यांनी 493 मते घेत काँग्रेसच्या वसंत राऊत (406) यांचा पराभव केला. प्रभाग 4 मध्ये भाजपाचे रामदास धुडस यांनी 266 मते घेत विजय मिळविला. प्रभाग 5 मधून भाजपाचे गुणवंता पटले यांनी 288 मते घेत काँग्रेस उमेदवाराचा (187) पराभव केला.

प्रभाग 6 मध्ये भाजपाच्या छाया मेश्राम विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या योगिता घोडकाडे यांचा पराभव केला. प्रभाग 8 मधून भाजपाचे सोनू कांबळे यांना 198 मतांवर विजय मिळविला. प्रभाग 9 मध्ये भाजपाचे उमेदवार रोहित जनबंधू केवळ 8 मतांनी पराभूत झाले. प्रभाग 10 मध्ये भाजपाचे विजय राऊत यांनी 319 मते घेत काँग्रेसच्या सचिन वानखेडे (246) यांचा पराभव केला. प्रभाग 11 मध्ये भाजपाच्या सारिका झोड यांनी काँग्रेसच्या शोभादेवी पवनकर यांचा पऱाभव केला. प्रभाग 12 मधून बसपाच्या सविता वानखेडे विजयी झाल्या. प्रभाग 13 मधून भाजपाच्या सविता ढेंगे यानी 203 मते घेत अपक्ष हेमलता वर्मा (193) यांचा पराभव केला. प्रभाग 14 मध्ये भाजपाच्या संगीता वरठी (443) यांनी काँग्रेसच्या साईबाई उईके (269) यांचा पराभव केला.

प्रभाग 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपात सरळ लढत झाली. यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. प्रभाग 16 मध्ये भाजपाचे पंकज ढोणे यांनी 342 मते घेत काँग्रेसच्या संघरत्न मेश्राम (193) यांचा पराभव केला. प्रभाग 17 मध्ये एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. येथे काँग्रेस, भाजपा, बसपा उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाचे 11, काँग्रेसचे 4, बसपाचा 1, अपक्ष 1 निवडून आले. शिवसेनेचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही.

भाजपाच्या विजयी उमेदवारांनी दुपारी शहरातून विजयी मिरवणूक आयोजित केली होती. संपूर्ण शहरभर ही मिरवणूक वाजत गाजत फिरली व मतदारांचे उमेदवारांनी आभार मानले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मतदारांचे आभार मानले आहे.

Advertisement