नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दृश्यम स्टाईलने प्रेयसीची हत्या करून मृतदेह जंगलात पुरणाऱ्या आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीने महिलेची हत्या कशाप्रकारे केली, याबाबत खुलासा केला. पोलीस उपायुक्त (डीसीपी) परिमंडळ ४- रश्मिता राव यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली.
अजय वानखेडे (३३, न्यू कैलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर ज्योस्त्ना आकरे (३२) असे मृत तरुणीचे नाव आहे. ज्योत्स्ना ही टेलिकॉलर म्हणून नोकरीला होती. तिचा घटस्फोट झाला होता व दुसऱ्या लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती.
यातूनच तिची आरोपी अजयसोबत ओळख झाली होती. अजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्न करण्याचे वचन दिले. मात्र प्रत्यक्षात त्याने १९ मे मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. ही बाब त्याने ज्योत्स्नापासून लपवून ठेवली होती. २८ ऑगस्ट रोजी आरोपी अजयने ज्योत्स्नाला भेटण्यासाठी बोलविले व तिला कारमधून वारंगा येथील निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तिचे पूर्ण कपडे काढून जवळील निर्जन स्थळी तिचा मृतदेह मेणकापड व प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. तेथे त्याने निवांतपणे सिमेंटने फ्लोअरिंगदेखील केले. यानंतर तिचे कपडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्यानंतर आरोपीने ज्योत्स्ना हीच फोन एका चालत्या ट्रॅकमध्ये फेकून दिला.
कुटुंबियांकडून अपहरणाची तक्रार दाखल-
२८ ऑगस्ट रोजी ज्योत्स्ना बेसा येथे तिच्या मैत्रिणीकडे थांबण्यासाठी गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी फोन लावून मैत्रिणीला विचारणा केली. ज्योत्स्ना रात्री आठ वाजता फोनवर बोलण्यासाठी जवळील बगिच्यात गेली व तेथून परत आलीच नाही असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. तिच्या नातेवाईकांनी १७ सप्टेंबरपर्यंत तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती न सापडल्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
ज्योत्स्ना हीचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलमुळे पोलिसांना सुगावा लागला. तिचा मोबाईल आरोपीने हैदराबादला गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. तो ट्रक काही दिवसांनी नागपुरात परत आला व ट्रकचालकाला त्यात मोबाईल दिसला. त्याने त्यातील सीम काढून वेगळे सीम टाकले. तेव्हा पोलिसांना मोबाईल फोन ट्रेस झाला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली असता त्यांना मोबाईलबाबत माहिती मिळाली. यानंतर या घटनेचा उलघडा झाला.
तरुणीचा मोबाईल फोन सापडल्यावर सीडीआर काढला असता त्यात पोलिसांना ती गायब होण्याच्या वेळी अजयसोबत बोलत असल्याची बाब लक्षात आली. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो तेथून पुण्याला गेला. त्याने अटकपूर्व जामिनासाठीदेखील अर्ज केला होता. मात्र तो फेटाळल्या गेला. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र अखेर त्याने तिचा मृतदेह पुरलेली जागा दाखविली.आज पोलिसांनी जंगलात पुरलेला मृतदेह बाहेर काढत पुढील तपास सुरु केला आहे.