नागपूर: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सुद्धा आज मोहन भागवत यांची भेट घेतली. आगामी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
अमित शाह साधारण सव्वाबारा वाजता संघ मुख्यालयात दाखल झाले. त्यावेळेस उमा भारतीसुद्धा संघ मुख्यालयात होत्या. त्यानंतर एक वाजता उमा भारती संघ मुख्यालयातून बाहेर पडल्या. आगामी तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर अमित शाह यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निधानसभा निवडणूकीबाबत चर्चेसाठी ही भेट असल्याची सुत्रांची माहिती आहे. पूर्वेकडील तीन राज्यातील निकालानंतर अमित शाह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रतिनिधी सभेतही संघ नेत्यांची आणि अमित शाह यांची भेट झाली होती. गेल्या दोन महिन्यातही आज मोहन भागवत आणि अमित शाह यांची ही तिसरी बैठक आहे.
कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. यामुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. लिंगायत समाजाच्या नाराजीमुळे कर्नाटक निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.