नागपूर: शहरात रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालवत चालकाने एका दुचाकिसह चार ते पाच गाड्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक दिलेल्या वाहनांचा चेंदामेंदा झाला.
हा अपघात राजकीय नेत्याच्या मुलाच्या गाडीने झाल्याचे सांगण्यात येत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा कारमध्ये असल्याची माहिती होती. मात्र सीताबार्डी पुलिस स्टेशनचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक चंद्रकांत चकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,ऑडी कार बावनकुळे यांचा ड्राईव्हर अर्जुन जितेंद्र हावरे (वय 24) चालवत होता. यादरम्यान त्याच्यासोबत रोनित चिंतमवार (वय 27) नावाचा त्याचा मित्रही सोबत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मद्यधुंद भरधाव ऑडी कार चालवत दुचाकीसह चार ते पाच चारचाकी गाड्यांना धडक दिली. काचीपुरापासून ते सेंटर पॉईंट हॉटेल लोकमत चौकापर्यंत हा अपघात घडत गेल्याने यादरम्यान परीसरात खळबळ उडाली.
इतकेच नाही तर कारने आरबीआय चौकातही एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची ही ऑडीची महागडी इलेक्ट्रॉनिक कार होती. कार चालक राजकीय नेत्याचा मुलगा जवळपास 150 च्या स्पीडने कार चालवत होता. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कारचालकाला ताब्यात घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शिंची विचारपूस सुरू केली. तसेच घटनेचा पुढील तापस सुरू केला आहे.