नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाईल फोन मिळाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर कारागृहातील प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षारक्षक हा काही दिवसांपूर्वीच कारागृहात तैनात झाला. पोलिसांचा त्याच्यावर संशय असून, लवकरच त्याची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. कारागृहात सुरु असलेल्या या प्रकारानंतर अनेक कैद्यांकडे मोबाईल बॅटरी आणि चार्जर असल्याची बाब उघडकीस आली आहे.
सध्या कारागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा कॉल करून धमकी देत खंडणी मागणारा जयेश पुजारी यांच्यासह चार दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल लागल्यास मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारागृह रक्षकांच्या माध्यमातून कारागृहातील बंदिवानांना सर्रासपणे मोबाईल, बॅटरी, चार्जर, गांजा देण्यात येतो. त्यातून ते कारागृहात राहून बाहेरच्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवत आहेत.
जयेश पुजारीसारख्या गुन्हेगाराच्या अटकेनंतर त्यांना कारागृहात सहजरित्या मोबाईल वा इतर साहित्य उपलब्ध झाल्यास ते कशाही पद्धतीने षडयंत्र रचून गुन्हेगारी घडवू शकतात. पुजारी याने बंगळूरू येथील बेळगाव कारागृहातून अशाच प्रकारे फोन मागवित, अनेकांना कॉल करीत धमकी दिली होती.
नागपूर कारागृहात पुजारी यांच्यासोबत एहतेशाम सिद्दीकी, सेमिदा हनीफ, अशरफ अंसारी या फाशीच्या कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे अशांच्या हातात मोबाईल लागल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सुरु असलेल्या या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे.