Published On : Thu, Apr 6th, 2023

नागपूर परिमंडलात वर्षभरात ८ हजार नव्या जोडण्या,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Advertisement

नागपूर : महावितरणच्या वतीने मागील आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलात ८ हजार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यात अनुसूचित जातीतील ८३२ तर अनुसूचित जमातीतील २९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या जोडणीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी विविध योजने अंतर्गत तत्परतेने कार्यवाही केली जात आहे. विशेषतः जिथे पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. नागपूर परिमंडलाच्या वतीने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ८ हजार १० शेतकऱ्यांना वीज जोडणी देऊन त्यांना दिलासा देण्यात आला आहे. नागपूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या नागपूर शहर मंडल अंतर्गत ३१०,वर्धा शहर मंडल अंतर्गत ३ हजार ७२७ तर नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत ३ हजार ९७३ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या १ हजार १२९ शेतकऱ्यांसह खुल्या प्रवर्गातील ३ हजार ३१ व मागास प्रवर्गातील ३ हजार ८५० शेतकऱ्यांना महावितरणने नवीन वीज जोडणी दिली आहे.

शेतकऱ्यांनी अनधिकृत वीज वापर न करता महावितरणच्या योजनांचा लाभ घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी तसेच विजेचे बिल नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Advertisement