Published On : Wed, Apr 25th, 2018

नागपूर: मिहानमध्ये फाल्कन विमानाच्या कॉकपिट जोडणीला प्रारंभ

Advertisement

Cockpit Assembling Falcon jet

नागपूर: उद्योजक अनिल अंबानी यांच्या मिहान-सेझमधील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) या कंपनीने फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशनच्या ‘फाल्कन’ या फॅमिली बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिटची जोडणी, लॅण्डिंग भागांसह सुटे भाग आणि गिअरची निर्मिती एका छोटेखानी समारंभानंतर १८ एप्रिलपासून सुरू केली आहे. कंपनीचा हा पहिला टप्पा आहे.

प्रारंभी २० हजार चौरस फूट जागेवर काम सुरू
या प्रकल्पात पाच अभियंत्यांसह स्थानिक ३० तंत्रज्ञांसह ५० जण कार्यरत आहेत. विस्तारीकरणात अनेक अभियंत्यांना रोजगाराची संधी आहे. धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क मिहान-सेझमधील १०६ एकर जागेवर उभा राहणार आहे. या पार्कमध्ये ५६ एकर जागेवर डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडचा प्रकल्प आहे. प्रारंभी २० हजार चौरस फूट जागेवर कॉकपिटची जोडणी आणि सुट्या भागांची निर्र्मिती सुरू केली आहे. या जागेवर मशीनरीची उभारणी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात ‘डीआरएएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संपतकुमार आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी रॉबर्ट लूक यांच्या नेतृत्वात ६० दिवसांत झाली आहे. सप्टेंबर २०१७ पासून दोन्ही अधिकारी नागपुरात आहेत. या ठिकाणी नवीन लोकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी वर्कशॉप तयार केले आहे. प्रारंभी कंपनीने पाच अभियंत्यांना फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीत सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणानंतर त्यांनी प्रकल्पात काम सुरू केले आहे. तर ३० तंत्रज्ञांना कामठी येथील विशेष प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले आहे.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तीन वर्षांत प्रत्यक्ष विमानांची निर्मिती
पार्कमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष फाल्कन विमानांची निर्मिती आणि पाच वर्षांत लढाऊ विमाने राफेलची निर्मिती होणार आहे. भारताने फ्रान्सकडून ६५ हजार कोटी रुपयांत ६५ विमाने खरेदी केली आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी अर्धी गुंतवणूक डसॉल्ट एव्हिएशनला भारतात करणे बंधनकारक आहे. त्याअंतर्गत डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने मिहान-सेझमध्ये कार्य सुरू केले आहे.

फ्रान्समधून मशीनरीची आयात
डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस कंपनीने फ्रान्समधून सुट्याभागांच्या निर्मितीसाठी मशीनरीची आयात केली आहे. फ्रान्समधून कन्टेनरने मशीनरी चेन्नई येथे आणि तेथून नागपुरात आणण्यात आली. आवश्यकता आणि विस्तारीकरणांतर्गत आणखी मशीनरी आयात करण्यात येणार आहे.

नागपुरात एअरोस्पेस हब होण्याची क्षमता
विमानांच्या सुट्याभागांच्या निर्मितीसह नागपुरात एअरोस्पेस हब होण्याची क्षमता निर्माण झाली आहे. फ्रान्स येथील ‘टर्गीस अ‍ॅण्ड गाया’ कंपनीने विमानांच्या सुट्याभागांच्या निर्मितीसाठी एअर इंडिया एमआरओ आणि टाल कंपन्यांच्या मध्ये एक एकर जागा खरेदी केली आहे. पावसाळ्यानंतर बांधकाम आणि प्रत्यक्ष निर्मिती फेब्रुवारी २०१९ पासून होणार आहे. ही कंपनी ‘डीआरएएल’ला सुटेभाग पुरविणार आहे. या कंपनीचे भूमिपूजन २० एप्रिलला झाले. चार दिवसांपूर्वी फ्रान्स आणि युरोपमधील विमान क्षेत्रात कार्यरत २६० कंपन्यांची संघटना फ्रान्स एअरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (गिफास) २० कंपन्यांच्या ३५ प्रतिनिधींनी मिहान-सेझला भेट दिली होती. त्यापैकी काही कंपन्यांनी या भागात प्रकल्प सुरू करण्यास रुची दाखविली आहे. या भागात एअर इंडियाचा एमआरओ कार्यरत आहे; शिवाय इंदामार एमआरओचे काम वेगात सुरू आहे. तसेच एअर इंडियाच्या एमआरओपासून पुढे १४०० मीटर टॅक्सी-वेचे बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे अन्य कंपन्यानाही मिहान-सेझमध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement
Advertisement