नागपूर : कोरोना साथीच्या प्रादुर्भावाबाबत संत्रानगरी नागपुरातील परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रतिदिवसाच्या आकड्यांचा दररोज नवीन उच्चांक होताना दिसत आहे. शहर व ग्रामीण भागातील झपाट्याने वाढत चाललेल्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर घातली आहे. शुक्रवारी दिवसभरात नागपुरात २५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,३९२ वर तर बळींची संख्या १२६ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)मध्ये तीन मृत्यूची नोंद करण्यात आली. मेडिकलमध्ये जिल्ह्यातील कढोली येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तिला २९ जुलैला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. ३० जुलैला रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला. अहिमनगर येथील ६२ वर्षीय पुरुषाची श्वसन क्रिया बंद झाल्याने शुक्रवारला १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. कोलटोटा येथील ३८ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास असल्याने ३० जुलैला तिला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर कोविड वॉर्डात उपचार सुरू असताना शुक्रवारला सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला. तर अमरावती येथील ६० वर्षीय वृद्धाचा आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. याशिवाय एका मृतदेहाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. तर मेयोमधील तीन मृत्यूंची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकली नाही. आतापर्यंतच्या मृतांमध्ये शहरी भागातील ७६, ग्रामीण भागातील २० तर जिल्ह्याबाहेरील ३० जण आहेत.
शुक्रवारी २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये शहरी भागातील १२६ तर ग्रामीण भागातील १३२ रुग्णांची नोंद झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या प्रयोगशाळेतून ३६, राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी)च्या प्रयोगशाळेतून ३७, महाराष्टÑ पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) च्या प्रयोगशाळेतून ८, रॅपिड अॅन्टिजेन तपासणीद्वारे १२, खासगी प्रयोगशाळेतून ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या विषाणू प्रयोगशाळेतून तब्बल ७३, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मधून ५०, असे एकूण २५८ जणांचे आज दिवसभरात अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या ५ हजार ३९२ वर पोहचली आहे.
तर आज विविध रुग्णालयांतून १३० जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने सुटी दिल्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ३,४७७ वर पोहचली आहे.