नागपूर:‘कंट्री क्लब’ या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून एका ग्राहकाला २ लाख ७० हजारांनी गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. किशोर गौर असे पीडित व्यक्तीचे नाव असून ते नारी रोड कपिल नगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी १३ जानेवारी २०१८ ला कंट्री क्लबची ३० वर्षांची सदस्यता घेतली होती. यामध्ये त्यांना प्रत्येक वर्षी ६ रात्री आणि ७ दिवसांचे टूर पॅकेज, यात २ कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल टूर पॅकेज, एक डोमेस्टिक टूर पॅकेज, एक अपडेटेड आयफोन, लाईफटाइम व्हीएलएम क्लब कार्ड, डीएई इंटरनॅशनल कार्ड या सुविधांचा समावेश होता. टुरिंग पॅकेजमध्ये २ वयस्क आणि ३ मुले किंवा फक्त ३ वयस्क असे पर्याय गौर यांना देण्यात आले होते. परंतु यातील कोणतीही सुविधा अद्याप त्यांना मिळाली नसल्याचे गौर यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात किशोर गौर यांनी सांगितले की, ते मागील दोन महिन्यांपासून कंट्री क्लबच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधत आहेत परंतु त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. आम्ही घेतलेल्या पॅकेजमधील एकही सुविधा आम्हाला आजवर मिळालेली असून टूर पॅकेजबाबत काही विचारणा केली कि कर्मचारी टाळाटाळ करतात अशी तक्रार गौर यांनी केली.
याविषयी कंट्री क्लब नागपूरचे लाईन मॅनेजर अंकन टिलक मजुमदार यांच्याशी ‘नागपूर टुडे’ प्रतिनिधीने बातचीत केली असता सांगण्यात आले की, किशोर गौर यांनी मागितलेल्या तारखांना आमचे हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध नसल्याने आम्ही त्यांच्या इचछेनुसार मे महिन्यात टूर पॅकेज अरेंज करून देऊ शकलो नाही. तारखांचा मुद्दा असल्याने थोडा वाद सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
गौर यांनी अंकन मजुमदार आणि सेल्स विभागाची एक महिला कर्मचारी यांच्यासोबत झालेल्या मोबाईल संभाषणाची रेकॉर्डिंग व त्यांना कंट्री क्लबने दिलेल्या पॅकेजची कागदपत्रे आणि मेल ‘नागपूर टुडे’ ला पाठवले. सदर रेकॉर्डिंगमध्ये मजुमदार आणि महिला कर्मचारी दोघेही किशोर गौर यांच्या कोणत्याच प्रश्नाला स्पष्ट उत्तर न देता दोन-तीनदा त्यांची माफी मागतात. तसेच ती महिला कर्मचारी गौर याना मलेशियाचे टूर पॅकेज अरेंज देण्याचे आश्वासन देते आणि त्यांनाही सिंगापूर ऐवजी हे पॅकेज ट्राय करण्याचे देखील सुचवते.
दरम्यान किशोर गौर धरमपेठ येथील कंट्री क्लबच्या कार्यालयात आपले पॅकेज रद्द करून रकमेचा परतावा मागण्यासाठी गेले असताना त्यांना पैसे परत मिळणार नाहीत असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता त्यांनी कंट्री क्लब विरोधात पोलिस व ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची तयारी चालवली आहे.
—By Swapnil Bhogekar