नागपूर : स्वत:चे घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जसा प्रयत्न करते अगदी त्याचप्रमाणे मी नागपूर शहराला सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न करेन, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र आणि प्रेस क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी प्रारंभी डॉ. उपाध्याय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी मिट द प्रेसची संकल्पना सांगितली.
नागपूर शहराच्या सुरक्षेसंबंधाने पोलीस आयुक्त म्हणून आपली जबाबदारी तसेच कल्पना सांगताना डॉ. उपाध्याय यांनी भाष्य केले. पब्लिक ओरिएंटेड पुलिसिंगवर आपण भर देणार आहोत. पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाला येथे दिलासा मिळेल, अशी व्यवस्था करण्याचे आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
शहरातील गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी इतर महानगराच्या तुलनेत येथील गंभीर गुन्हे कमी असल्याचे म्हटले. गुन्हेगारी आणखी कमी करण्यासाठी शहरातील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. बालगुन्हेगारी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. कायद्याप्रमाणे त्यावर ज्या उपाययोजना करायच्या त्या करूच मात्र एनजीओच्या मदतीने समुपदेशन आणि जनजागृती करून हा मुद्दा हाताळण्याचा प्रयत्न करू. बालगुन्हेगारीच्या संबंधाने प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र अधिकारी नेमू, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले. आर्थिक गुन्हे झपाट्याने वाढत आहेत, पीडितांना त्यांची रक्कम परत मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असता या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यू हा स्वतंत्र सेल आहे. मात्र, केवळ तपासाने समस्या सुटणार नाही. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडूच नये, यासाठी सतर्कता तसेच जनजागरण होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
महिला – मुली तसेच बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. नशेच्या आहारी चाललेली तरुणाई, बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी मंडळी तसेच विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यासंबंधाने अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.
हे माझे शहर आहे, येथील पोलीस माझे पोलीस आहेत आणि मी येथे सुरक्षीत आहे, ही भावना नागरिकांमध्ये रुजविण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आपल्या कार्यकाळात आपण हे करू शकलो, तर ती आपली आयुष्याची कमाई राहिल, असेही शेवटी डॉ. उपाध्याय म्हणाले.