नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने कोराडी परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर यशस्वी कारवाई केली. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी 5:50 ते 6:30 वाजतादरम्यान हा छापा टाकण्यात आला.
पथकाने बोखारा येथील घोंगे लेआउट परिसरात गस्त घालत असताना सार्वजनिक वटवृक्षाखाली बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना शोधून काढले.घटनास्थळी छापा टाकून पोलिसांनी पैशासाठी पत्ते खेळणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडले.
तुषार गणेश शंभरकर (वय 23, रा. महादुला), महेश संजय चौधरी (24, रा. धांगरे लेआउट, कोराडी) आणि देवेंद्र योगराज नवधिंगे (36, रा. सुरादेवी, कोराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे. यातील इतर पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यात गौरव झेले (26) आणि करण देवकर (28, दोघे रा. महादुला, कोराडी) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 6,300 रोख, पत्ते, तीन मोबाईल फोन आणि चार दुचाकी असा एकूण 3,96,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर कोराडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना जप्त केलेल्या वस्तूंसह पुढील तपासासाठी कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यानुसार तपास सुरु करण्यात आला आहे.