नागपूर : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याच्या व्हीसीएमडी स्वाती पांडे या रजेवर गेल्याने इटनकर यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. इटनकर यांची मिहान इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने प्रशासकीय फेरबदल केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक लक्ष त्यांच्या गुह जिल्हा, नागपूरकडे आहे.
उपराजधानीच्या विकासाशी संबंधित सर्व प्रकल्पांवर मुख्यमंत्री सातत्याने लक्ष देत आहेत. हे पाहता नुकतीच मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. विद्यमान उपाध्यक्ष स्वाती पांडे या रजेवर गेल्याने सरकारने इटनकर यांच्याकडे हा पदभार दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारने इटनकर यांची मिहान इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची माहिती आहे. पुढील आदेशापर्यंत विमानतळाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार इटनकर यांच्याकडे असतील.