नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमधून नागपूरला वगळल्याने नागपूर-विदर्भातील क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. यापार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांना थेट पत्र लिहिले आहे.
बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे नागपूरकर क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखावल्या. हे लक्षात घेता जामठा येथील स्टेडियमवर सामने घेण्यात यावेत, असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्राद्वारे केले आहे. देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपूरचे महत्त्व लक्षात घेता यंदाही विश्वचषकातील काही लढती नागपुरात होतील, अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींना होती.
मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. क्रिकेट शौकिनांच्या भावना व रोष लक्षात घेऊन विश्वचषकातील तीन सामने नागपुरात आयोजित करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली.जगातील सर्वोत्तम स्टेडियममध्ये जामठा येथील स्टेडियमचाही समावेश होतो. या मैदानावर कसोटी, एकदिवसीय व टी-२०सारखे आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले. त्यास नागपूर-विदर्भातील शौकिनांनी उदंड प्रतिसाद दिला. २०११मध्ये विश्वचषयकातील भारत-दक्षिण आफ्रिकेसह चार महत्त्वाचे सामने याच मैदानावर झाले. मुख्य स्पर्धेपूर्वी याच मैदानावर सराव सामन्यातून खेळाडूंनी सराव केला, असेही देखमुख यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान नागपूर वगळता अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा आणि लखनऊ या शहरांमध्ये होणार आहे.