Published On : Tue, Sep 19th, 2023

नागपुरच्या टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दी !

Advertisement

नागपूर:गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नागपूरचा ग्राम दैवत असा मान असलेला गणपती म्हणजे टेकडी गणेश ओळखले जातात.सकाळी पहाटेच्या आरतीपासून टेकडी गणपती मंदिरात ही 10 दिवसीय गणेश उत्सवाला सुरवात झाली. यानिमित्ताने सकाळपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या.

नागपूरच्या टेकडी गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते. शहरातील सीताबर्डी येथे असलेले गणपतीचे हे भव्य दिव्य मंदिर सुमारे 250 वर्षे जुने आहे.असे म्हणतात की या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. म्हणजेच 250 वर्षांपूर्वी ही मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली प्रकट झाली होती, असे म्हटले जाते.

Advertisement

टेकडी गणपती मंदिराचा इतिहास – टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले प्राचीन गणपती मंदिर आहे. हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे समजते. भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे.मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो. दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फौजी गणपती म्हणून ओळखला जातो.