नागपूर : शहरातील जरीपटका परिसरात गणपती मूर्तीवरून मोठा वाद पेटला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रुद्र अवतार गणेश मंडळच्या पंडालमध्ये जाऊन गोंधळ घालणे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वेदप्रकाश आर्य यांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायिक मजिस्ट्रेट प्रथम श्रेणी (जेएमएफसी) एस.एम. बिरहरी-जगताप यांनी याप्रकरणी सुनावणीत हा निर्णय घेतला.
डीसीपी झोन ५ निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात रुद्र अवतार गणेश मंडळाने स्थापित केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर अनेकांनी आक्षेप घेतला. कारण गणपती मूर्तीवरील सोंड ड्रेनेज पाईपद्वारे तयार करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मंडळाकडून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मात्र या वादात राष्ट्रवादीचे नेते वेदप्रकाश आर्य (वय. ६५ जरीपटका, नागपूर) यांनी उडी घेतली.
काही लोकांनी त्यांना दिलेल्या चुकीची माहितीमुळे त्यांनी आवेशात येऊन रुद्र अवतार गणेश मंडळ परिसरात जाऊन गोंधळ घातला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.