नागपूर :बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.
मनीषनगरातील महाकाली नगर येथील रहिवासी धनराज केशव वर्मा (२१ वर्ष) व सोनू रम्मत वर्मा (२५) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील दरीगाव येथील आहेत.
माहितीनुसार,गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांना परिसरात देशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. उत्कर्ष कॉम्प्लेक्स समोर एम.एच ३१ ई. झेड ३०७३ या दुचाकीला थांबवले. दुचाकीची झडती घेतली असता आरोपींकडे देशी दारूच्या २०० बाटल्या आढळल्या. पोलिसांनी आरोपींकडून दारूच्या बाटल्या, मोटरसायकल व मोबाईल जप्त केले. त्यानंतर आरोपींना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, विनोद देशमुख, रितेश तुमडाम, चंद्रशेखर भारती, रविन्द्र राऊत यांच्या पथकाने केली.