नागपूर : सतीश देवांगण या ३२ वर्षीय कथित बुकीला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी तेलीपुरा भागातील एका अपार्टमेंटमधून पकडले. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) हंगाम सुरू झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी बुकींविरुद्ध केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक राउटर आणि एक टॅबलेट जप्त केला आहे. देवांगन चालू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत असतानाच गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारच्या सामन्यावर सतीश सट्टा लावत होता. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने छापा टाकून सतीशला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक राऊटर आणि टॅबलेट असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सतीश हा कुख्यात बुकी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून हे काम करतो. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांना एका खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यांनी तत्परतेने कारवाई करत सतीशला सहज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.